इथे एक गांव होते …!(ललित)
माहित नाही पण .. इथे एक राणी होती .
निसर्गात रमणे हेच तिचे जगणे .
जणु निसर्ग तिच्यासाठी अन ती निसर्गासाठी !
धुक्याच्या दुलईतून ,पावसाचे तुषार अंगावर घेत ,
झोंबणारा गार वारा अनुभवत ,भटकंती करायची ..
अन निसर्गात रमायचं ..निसर्गात जगायचं .. निसर्ग हाच तिचा धर्म !
ती इथे आली ,तुझ्या पायथ्याशी !
तू भावलास तिला .. तुझी कुशी भावली .
तुझ्या काळ्या पाषाणाची ,लाल मातीची भूरळ पडली तिला !
ती इथेच रमली .. तिने इथे हिरवळ अंथरली ...
मातीच्या दगडातून फुलांचे मळे फुलवले .
गुडघाभर चिखलात ओणवे होऊन भाताचे मोती पेरले !
जगण्याची लढाई अवघड होती ,
पण तिने हार नाही मानली ..
तुझ्याच कुशीचा आधार होता तिला!
तुही रमलास तिच्यात ,
कधीकधी उगीचच वाटायचे तिला ..
पाय ठेऊ तर माती घसरून पडेल !
पण तू तिला पार मोहातच पाडलेस रे !
तुझ्या तंद्रीत ती ,तशीच तोलून उभी राहिली .
तिचे सारे स्वप्न या इवल्याश्या माळरानी सामावले .
तिने माती सारवली ,अंगण केले ,फळे .. फुले .. पक्षी..
एकाचे दोन ..दोनाची चार . . चाराची आठ !
मुले बागडू लागली .. मुली खेळू लागल्या .
झोंके उंचच उंच स्वप्नांचे !
राणी आपल्याच नादात ,,तुझ्याच प्रेमात !
ती हसू लागली.. गाऊ लागली.. नाचू लागली !
![](http://4.bp.blogspot.com/-cLDx8QuoMU8/U-9QQhNOXmI/AAAAAAAAAF8/lAO91fnh-2Q/s1600/malin2.jpg)
(तू झोपेत होतास ना )
तू बघशील म्हणून एक पणती रोज लावायची ती या दगडावर !
तू ओळखावेस म्हणून हातावर गोंदून घेतले …
लांबून तुला दिसणार कसे?
मग तिने कपाळावर गोंदून घेतले तुझ्यासाठी ,
"माळीण " .
तू हळू हळू झोपेतून जागा झालास (का जागा झालास?)
तिला आंनदाने न्हाताना बघून तुझा पुरुषी "अहंकार"जागा झाला..
माझ्याशिवाय ,माझ्या कुशीत हिने नांदावे ?तुझा थयथयाट झाला !
तू दोन्ही हातांनी चिखलच फेकला तिच्या माथ्यावर !!
क्रूर , निर्दयी ,निष्ठूर !!
ती तुझी माळीण होती .
पुसल्यात खुणा तू ,तिच्या जगण्याच्या ..
अनेक जीव टाकलेस गाडून
ओतलेस नुसते मातीचे ढिगारे
सगळाच चिखलच चिखल.. !
असा चिखल कधी पडलाच नव्हता !
मेघारे .. मेघारे ,मत बरसो ssss तिचे आर्त शब्द ओठांवरच राहिले ,
भावना फुटून, उरातून बाहेर आल्याच नाहीत .
गांव फुलांचे होते मग भर श्रावणात हा कसला वणवा ??
तुझेच पाणी .. तुझाच घडा
तुझ्याच मातीत.. प्रेतांचा सडा .. ?
तुला वाटतात तितके सोपे नसतात अश्रू ?
आता बस बघत तू..
वेदनांचा डोंगर छातीवर पेलून आपल्या माणसांना शोधणारे चेहरे ..
थिजलेले डोळे आणि हुंदके .. !
तू भीमा .. स्वतःला शंकर म्हणून घेतोस.
जराही पाझर नाही फुटला तुला ?
पण निसर्ग नियम ..... देण्याचे येणे चुकत नाही कधी !
तिच्या आठवणीनी तुझ्याही मनाचा बांध फुटेल एक दिवस ..
तुझाही कंठ दाटून येईल ..
तुझाही शोक अनावर होइल..
तुही रडशील एक दिवस ,आणि म्हणशील ..
इथे एक राणी होती
इथे एक माळीण होती!
( संध्या )
'
'
No comments:
Post a Comment